आईस्क्रीमच्या बहाण्याने बोलवून वृद्धाचा आठ वर्षीय बालिकेशी लैंगिक गेरवर्तन

Foto
 छत्रपती संभाजीनगर : आईस्क्रीम देण्याचे आमिष दाखवून आठ वर्षांच्या चिमुकलीला बोलावले आणि तिच्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप ७० वर्षीय वृद्धावर करण्यात आला आहे. पाचोड (ता. पैठण) येथील बसस्थानक परिसरात रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी ही घटना घडल्याचे मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पाचोड पोलिसांनी सोमवारी (१९ ऑक्टोबर) रात्री उशिरा अब्बास बाबू सय्यद (वय ७०, रा. शिवाजीनगर, पाचोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या आठ वर्षीय मुलीसह आणि एका ओळखीच्या व्यक्तीसोबत १६ ऑक्टोबर रोजी रात्री पाचोड बसस्थानक परिसरात आली होती. यावेळी अब्बास सय्यद याने त्यांना राहण्याची व्यवस्था करून देण्याचे सांगितले. त्यानुसार, त्याने बसस्थानकाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये राहण्यास सांगितले.

रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास महिलेच्या सोबत आलेली व्यक्ती कामानिमित्त गावात गेली. त्यामुळे शेडमध्ये महिला आणि तिची मुलगी दोघीच होत्या. याच संधीचा फायदा घेत अब्बासने आईस्क्रीम आणल्याचे सांगून चिमुकलीला शेडबाहेर बोलावले. आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने त्याने मुलीशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

मुलीचा आवाज ऐकून तिची आई तातडीने शेडबाहेर आली. त्यानंतर चिमुकलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. मात्र, आपण नवीन ठिकाणी असल्याने भीतीपोटी महिलेने तातडीने पोलिसांत धाव घेतली नाही. त्यानंतर तिने हा प्रकार पाचोड पोलिसांना सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेत तिच्याकडे विचारपूस केली. यावेळी मुलीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत अब्बास बाबू सय्यद याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे करीत आहेत.